ठाणे - देवासमोर लावलेल्या पेटत्या दिव्यामुळे झोपड्यांना भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे या आगीत एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन जण जखमी झाले असून या आगीत ४ कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गजानन वाफेकर परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. लक्ष्मी शिवाजी म्हैसकर असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
देवघरातील पेटत्या दिव्याने केला घात; आगीत वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू - thane fire incident
ही घटना भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गजानन वाफेकर परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. लक्ष्मी शिवाजी म्हैसकर असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोलमजुरी करणारे शेकडो कुटुंब ठिकठिकाणी झोपडी उभारून राहतात. अशाप्रकारे राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गजानन वाफेकर परिसरात सुमारे २० कुटुंब झोपडी उभारून राहत होते. झोपड्या कार्डबोर्ड, प्लायवूड आणि प्लास्टिक लावून उभारण्यात आल्या होत्या. काल सायंकाळी एका झोपडीत असलेल्या देवघरातील तेलाचा दिवा पेटवून रोजच्याप्रमाणे पूजाअर्चा करण्यात आली होती. मात्र, त्याच रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक देवासमोरील पेटता दिवा कलंडला. त्यामुळे आग लागली. विशेष म्हणजे सर्व झोपड्या प्लायवूड आणि प्लास्टिक लावून उभारण्यात आल्याने या झोपड्यांनी लगेच पेट घेतला आणि काही वेळातच चार कुटुंबाच्या झोपडीतील संसाराची राखरांगोळी झाली, तर या आगीत लक्ष्मी नावाच्या वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. तसेच तीन महिलाही जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, झोपडीत देवासमोर लावलेल्या दिव्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर गरिबांच्या संसाराच्या राख रांगोळीसह वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.