ठाणे- वागळे प्रभाग समितीमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने संचारबंदीही वाढवण्यात आली आहे. वारंवार सूचना देवून देखील नागरिक सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 17 मे 2020 रोजी संचारबंदीची संपणारी मुदत वाढवून 24 मे 2020 पर्यंत वाढण्यात आली आहे. 17 मे 2020 च्या मध्यरात्रीपासून वागळे प्रभाग समितीमधील परिसर 24 मेपर्यंत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील वागळे प्रभाग समिती क्षेत्रात कोरोनाबाधितांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 मे पासून हा परिसर संचारबंदी क्षेत्र करुन देखील नागरिक रस्त्यावर, दुकानात, भाजीपाला दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. रस्त्यावरील वर्दळ देखील वाढत आहे. नागरिकांमार्फत सोशल डिस्टन्सचे पालन होत नसून संचारबंदी करुनही काही सुधारणा दिसून आलेली नाही.
रस्ता, दुकाने, भाजीपाला मार्केट या ठिकाणची गर्दी वाढतच आहे, त्यामुळे कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वागळे प्रभाग समिती परिसरातील कोरोना रुग्णांची दिवसेदिवस वाढत चाललेली संख्या विचारात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून 17 मे 2020 रोजी संचारबंदीची संपणारी मुदत वाढवून 24 मे 2020 पर्यत वाढण्यात आली आहे. सदर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह विषाणूचा वाढत चाललेला संसर्ग कमी करण्यासाठी संपूर्ण परिसर नागरिकांच्या वावरासाठी बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
या परिसरात अत्यावश्यक सेवेतील सुरू असणारी दुकाने आज पासून 24 मे 2020 पर्यंत पूर्णतः बंद करण्यात येत आहेत. यामध्ये मासळी, मटन व चिकन विक्री करणारी स्थायी आस्थापनेतील दुकाने, अन्नधान्याची दुकाने, बेकरी, भाजीपाला व फळांची स्थायी दुकाने व मनपाने तात्पुरती केलेली भाजीपाला व फळांची दुकाने दूध, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, मासळी, चिकन, मटण व इतर जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा बंद राहील. या परिसरातील फक्त औषधांची दुकाने, दुध डेअरी सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.