ठाणे : महाराष्ट्रासह देशामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यात बेरोजगार तरुणांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने नरेश मनेरा त्यांच्याकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 50 कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभाग घेणार असून 5000 पेक्षा अधिक तरुणांना आणि युवतींना या रोजगार मेळाव्यात रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आदित्य ठाकरेंसह अरविंद सावंत व राजन विचारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकार वरती टीका करत सहा महिन्यात सर्वच उद्योगधंदे गुजरातला पळवले असल्याची आरोप केले आहेत.
सरकार पडणार असल्याचा दावा : बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच सर्व आमदार टेबलवर चढून नाचले ही यांची विकृती असल्याचे टीका आदित्य ठाकरे यांनी केली. गद्दारांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, मनात राम आणि हाताला काम हे आमचे मत आहे, असे देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हे सरकार नक्की पडणार आणि चाळीस आमदारांना या सरकारने विहारच दिला आहे असे देखील वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. तर अनेकजण दावोसला जाता जाता लटकले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची अशाप्रकारे दाखवत आहेत, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.