ठाणे - भिवंडीमध्ये सात वर्षीय शाळकरी मुलीला आइस्क्रीमचे आमिष दाखवत तिचे अपहरण करून अमानूष अत्याचार ( Abuse A Minor Girl ) केला. मात्र, पीडिता घडलेला प्रकार घरच्यांना सांगेल या भीतीने तिची दगडाने ठेवून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला ठाणे विशेष पोक्सो न्यायालयात बुधवारी (दि. 20 एप्रिल) आरोप निश्चित करून त्याला फाशीची शिक्षा सुनावली ( Accused Sentenced to Death ) आहे, अशी माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली आहे. बहुदा ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पोक्सो न्यायायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याची वेळ असल्याचे सांगण्यात आले. भरतकुमार धनीराम कोरी (वय 30 वर्षे ), असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दहा तासात केली आरोपीला अटक -भिवंडी तालुक्यातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षीय शाळकरी मुलगी घराबाहेर खेळत असताना 21 डिसेंबर, 2019 रोजी शनिवारी रात्रीच्या सुमाराला आइस्क्रीमचे आमिष दाखवत नराधम भरतकुमारने अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर झुडपात नेवून तिची दगडाने ठेचून हत्या केली व पळून गेला होता. 22 डिसेंबर, 2019 रोजी रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तेथील झुडपात शौचास गेलेल्या एका व्यक्तीला तीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्याने आरडाओरड करत ही घटना पीडितेच्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद करुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता नराधम कोरी याला दहा तासात ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी तपास करत, पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत दोषारोपपत्र ठाणे जिल्हा व सत्र विशेष पोक्सो न्यायालयात दाखल केले होते.