ठाणे - आधारवाडी कारागृहातील (Adharwadi Jail) दोन बंदिवान कैद्यांनी एका तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्ठा टाकून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर कैद्यांनी स्वतःच्याच गळ्यावर धारदार पत्राने वार करून जखमी केले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बंदिवान कैद्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन अंकुश जाधव आणि रवींद्र धनाजी भोसले असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत. तर रोहित बाविस्कर (वय ५०) असे मारहाण झालेल्या तुरुंग अधिकाऱ्याचे नाव आहे.
Adharwadi Jail : कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्ठा टाकून केली मारहाण
आधारवाडी कारागृहातील (Adharwadi Jail) दोन बंदिवान कैद्यांनी एका तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्ठा टाकून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर कैद्यांनी स्वतःच्याच गळ्यावर धारदार पत्राने वार करून जखमी केले.
पूर्वनियोजित कट करून तरुंग अधिकाऱ्यावर हल्ला - कल्याण पश्चिमेला आधारवाडी कारागृह आहे. या कारागृहात आरोपी कैदी लखन आणि रवींद्र शिक्षा भोगत आहेत. त्यातच १३ एप्रिल रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तुरुंग अधिकारी बाविस्कर हे कारागृहातील बॅरेक नंबर सात जवळ आले असता, या दोघांनी पूर्वनियोजित कट करून तुरुंग अधिकाऱ्यावर मानवी विष्ठा अंगावर फेकली. तसेच त्या दोन कैद्यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर कारागृहातील इतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी येताच या कैद्यांनी लोखंडी धारदार पत्र्याने स्वतःवरच वार केले. यामध्ये त्यांच्या गळ्यावर व मानेवर जखम झाली आहे. कारागृहात गेल्या महिन्याभरात हाणामारीची दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे कारागृहातील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. या घटनेचा अधीक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल खोंडे करीत आहेत.