ठाणे- सिग्नलवरून उजवीकडे वळणाऱ्या बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने बसमधील तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. आज सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या घोडबंदर रोडवर चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्रह्मांड सिग्नलजवळ घडली. सुदैवाने कुठलीही गंभीर इजा विद्यार्थ्यांना झाली नाही. चितळसर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून अटक केली. जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.
गुरुवारी सकाळी युनिवर्सल शाळेच्या ३१ विद्यार्थ्यांना घेऊन शाळेची बस निघाली होती. बस चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्रह्मांड सिग्नलजवळ उजव्या बाजूला वळण घेत होती. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने शाळेच्या बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बसमधील अर्जुन, अर्जित आणि श्रेया हे विद्यार्थी जखमी झाले हे सर्व विद्यार्थी ८ ते १० वयोगटातील आहेत. शाळेच्या बसच्या पुढे असलेला दोन कारचेही मोठे नुकसान झाले आहे.