ठाणे- दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे मर्द व्यक्ती होते. परंतु उद्धव ठाकरे हे गुडघे टेकणारे नेते आहेत. त्यांना सत्तेचा लाडू जास्त खुणावत असल्याने ते बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान विसरल्याची टीका समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी केली आहे. भिवंडी शहर समाजवादी पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युती संदर्भात ते बोलत होते.
आझमी म्हणाले, काश्मीरच्या पुलवामा येथील हल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकार्यक्षमतेचे प्रतीक असून देशातील गुप्तचर यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे ते घडले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. नदीचे पाणीच नव्हे तर पाकिस्तान सोबतचे सर्व संबंध तोडून त्यांना एकदा प्रतिउत्तर देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व देश एक होईल.