महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"आपला दवाखाना" योजनेवरुन ठाणे पालिकेत खडाजंगी, विरोधानंतरही महासभेत प्रस्ताव मंजूर

आयुक्तांनी ज्या नगरसेवकाला आपला दवाखाना योजना नको असेल त्यांच्या प्रभागात ही योजना राबविली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या नंतरही विरोधकांनी या योजनेला विरोध दर्शविल्याने अखेर सत्ताधाऱ्यांनी गोंधळात हा प्रस्ताव मंजूर केला.

आपला दवाखाना

By

Published : Jun 22, 2019, 8:04 PM IST

ठाणे - किसननगर आणि कळवा येथे सुरु करण्यात आलेला "आपला दवाखाना' ही संकल्पना पुर्णत: फोल ठरली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ठाण्यात फक्त २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. तरीही, अतिरिक्त ५० केंद्र सुरु करुन सुमारे १६० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचे कारण काय? असा सवाल विरोधकांनी पालिकेच्या महासभेत उपस्थित केला.तसेच "आपला दवाखाना' या संकल्पनेलाच यावेळी विरोध करण्यात आला.

ठाणे मनपा, मिलिंद पाटील (विरोधी पक्ष नेते) आणि नरेश म्हस्के (सभागृह नेते) योजनेवर मत मांडताना

यावर आयुक्तांनी ज्या नगरसेवकाला आपला दवाखाना योजना नको असेल त्यांच्या प्रभागात ही योजना राबविली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या नंतरही विरोधकांनी या योजनेला विरोध दर्शविल्याने अखेर सत्ताधाऱ्यांनी गोंधळात हा प्रस्ताव मंजूर केला.

शहराच्या विविध भागात एकूण ५० आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेतला आहे. मेडीकल ऑनगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे. त्यानुसार शुक्रवारच्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. हा प्रस्ताव मंजुर होण्याआधीच निविदा काढली गेली असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी करून पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत. त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये १० रुपये दर आकारला जाणार असल्याने ही संकल्पना फोल असल्याचा मुद्दा मांडला.

आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही योजना गरीबांसाठी असून त्याचा खरा उपयोग त्यांनाच होणार आहे. तसेच जी संस्था हे उपक्रम चालवणार असेल त्यांच्याकडे जेवढे रुग्ण उपचार घेतील तेवढेच शुल्क त्यांना दिले जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रस्तावाचा पुन्हा विचार करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

खर्चाच्या मुद्यावर जो काही आक्षेप घेण्यात आला त्यावर जर एखादी दुसरी संस्था यापेक्षा कमी खर्चात ही संकल्पना राबविण्यास तयार असेल त्यालासुध्दा हे काम देता येऊ शकते, असे मत मांडले. काम करण्यास योग्य संस्था लोकप्रतिनिधींनी सुचविल्यास त्यांचेही स्वागत केले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या निवेदनानंतर विरोध काहीसा मावळला. परंतु, प्रस्तावाला विरोध कायम ठेवल्याने विरोध डावलून या प्रस्तावाला मंजूरी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details