ठाणे- कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना जगभरात अनेक डॉक्टरांना त्याची लागण होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी जे लोक काम करत आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी शिल्ड मास्क तयार करण्यात आला आहे. हे शिल्ड मास्क कल्याण तालुक्यातील 'सॅक्रेड हार्ट' या शाळेने तयार केले असून तो डॉक्टर आणि सहकर्मचाऱ्यांना नि:शुल्क देण्यात येणार आहेत, अशी माहिती शाळेचे शिक्षक भूषण जाधव यांनी दिली.
कोरोना विषाणूमुळे जगासह देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस आणि इतर यंत्रणा कोरोनाग्रस्त रुग्णांना यातून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र, हे काम करत असताना त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, त्यांचा सुरक्षेसाठी सॅक्रेड हार्ट शाळेने शिल्ड मास्कची निर्मिती केली आहे. शाळेत उपलब्ध असलेल्या ३डी प्रिंटर, लेसर क्राफ्टिंगच्या सहाय्याने व पृसा या अंतराष्ट्रीय ३डी प्रिंटरस्ट्रेस बनविणाऱ्या कंपनीच्या मार्गदशनखाली आंतराष्ट्रीय दर्जाचे शिल्ड मास्क शाळेकडून बनविण्यात येत आहेत.