ठाणे -एका तीन वर्षाच्या चिमुकलीला आमिष दाखवून अपहरण करण्याच्या बेतात असणाऱ्या अपहरणकर्त्याला सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानाने पकडण्यात यश आले आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील पलावा सिटी या हाय प्रोफाईल सोसायटीच्या गार्डनमध्ये घडली आहे. अपहरणकर्त्यांचे नाव जितेंद्र सहानी असे आहे. या घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड; घटना सीसीटीव्हीत कैद - जितेंद्र सहानी
सोसायटीच्या गार्डनमध्ये मित्रांबरोबर खेळत असलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारा अपहरणकर्ता सीसीटीव्हीत कैद झाला. सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानाने हा अपहरणकर्ता पकडल्या गेला असून त्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्वे कडील कल्याण - शीळ मार्गावरील लोढा पलावा कासारीओ या नावाने हाय प्रोफाईल सोसायटी आहे. या सोसायटीच्या गार्डनमध्ये काल रात्री नऊच्या सुमारास तीन वर्षांची चिमुकली आपल्या मित्रांसह खेळत होती. अपहरणकर्ता जितेंद्र हा गार्डनमध्ये तिच्यावर पाळत ठेवून होता. अचानक संधी साधत त्याने या चिमुकलीला कडेवर उचलले व पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने जितेंद्रला अडवत आरडाओरडा केला. सोसायटीतील जमलेल्या रहिवाशांना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी आरोपी जितेंद्रला पकडून बेदम चोप देत मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून मानपाडा पोलीस ठाण्यात जितेंद्रवर अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.