ठाणे -वालधुनी पुलाच्या खाली असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकमध्ये ५ ते ६ महिन्याच्या पुरुष जातीचा अर्भक (गर्भ) फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदीर परिसरातील कैलास कॉलनी जवळील वालधुनी पुलाखाली घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदीर येथील कैलास कॉलनी जवळ वालधुनी पूल आहे. या पुलाखाली असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कचरा वेचण्यासाठी गेलेल्या एका मुलाला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधलेल्या स्थितीत मृत अवस्थेत हे अर्भक दिसून आले. त्याने या घटनेची माहिती परिसरातील नाागरिकांना दिल्यानंतर एका व्यक्तीने शिवाजीनगर पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच व.पो.नि.मनजीतसिंग बग्गा, पो.उप.नि.पऱ्हाड यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीतून ते मृत अर्भक ताब्यात घेतले. हे अर्भक ५ ते ६ महिन्याचा पुरुष जातीचे असून कोणीतरी अज्ञात महिलेने आपले मातृत्व लपविण्याकरीता त्याला येथे फेकले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.