ठाणे -गुजरात राज्यातील भडोच शहरातून एका २३ वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाची फूस लावून पळवल्याची घटना घडली होती. हा आरोपी पीडित मुलीसोबत भिवंडी तालुक्यातील ठाकुरपाडा, रांजणोली येथे राहत असल्याची बातमी पोलीस उपनिरीक्षक जिवन शेरखाने यांना लागताच त्यांनी या ठिकाणी पथकासह सापळा रचून आरोपीला अटक केली व त्यास गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले. अनील कुमार मंडल (वय, २३) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा -वालधुनी नदीत विषारी उग्रवासाने नागरिकांना बाधा; घरदार सोडून पलायन
अनील कुमार मंडल हा मूळचा बिहार राज्यातील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. मंडल हा गुजरातमधील अंकलेश्वर, भडोच शहरात जीआयडीसीमध्ये मजुरीचे काम करीत होता. त्यावेळी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख करून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर डिसेबर २०१९ मध्ये तिला फूस लावून पळविले. मंडला हा तिच्यासोबत तालुक्यातील ठाकुरपाडा, रांजणोली येथे एका खोलीत राहत होता.
विशेष म्हणजे, या प्रकरणी गुजरात राज्यातील अंकलेश्वर, भडोच येथील जीआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. तर, दुसरीकडे गुप्त बातमीदाराने पोलीस उपनिरीक्षक जिवन शेरखाने यांना पीडित मुलीची माहिती दिली. त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांना सांगितली व पोलीस उपनिरीक्षक डी.एस. नांगरे यांच्या पथकाने पीडित मुलीला ठाकुरपाडा, रांजणोली येथून ताब्यात घेतले.
मुलीला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, तीने आरोपी अनील कुमार याने प्रेमाचे आमिष दाखवून जबरदस्तीने पळवून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीचे अपहरण करणारा अनील कुमार मंडल याला पुढील कार्यवाहीकरीता कोनगाव पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खळबळजनक बाब म्हणजे, अल्पवयीन पीडित मुलीवर प्रेमाचे आमिष दाखवून आरोपीने अत्याचारही केल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. या पुढील तपास गुजरात पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा -पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू