ठाणे -मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एक हजार 900 हून अधिक नागरिकांवर ठाणे महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या नागरिकांकडून तब्बल 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही नौपाडा, माजिवडा-मानपाडा आणि त्यापाठोपाठ वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत करण्यात आली आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी मस्कचा वापर न करता फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केलेल्या प्रभावी उपाय योजनांमुळे ठाण्यात कोरोना आटोक्यात येत असला तरी अजूनही काही नागरिकांकडून नियमांचे गांभीर्याने पालन होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. विशेष करून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता काही नागरिक फिरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेने गेल्या तीन आठवड्यापासून विशेष मोहीम राबवली आहे. यामध्ये सर्व प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांनी जातीने लक्ष घालून तसेच प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून अशा नागरिकांवर कारवाई केली.