ठाणे - उल्हासनगर शहरात तीन पत्ते जुगार, हुक्का पार्लर, झटपट लॉटरी आदींचा सुळसुळाट असतानाच शहरातील सी ब्लॉक, डी टी कलानी कॉलेज परिसरातील स्मोक हाउस हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
उल्हासनगरात हुक्का पार्लरमध्ये चालु होता जुगार, ६ जणांना अटक - thane police news
पोलिसांनी गुप्त माहीतीच्या आधारे सी ब्लॉक मार्ग, डी टी कलानी कॉलेज परिसर येथे छापा टाकला असता काही जण जुगार खेळताना पोलिसांना आढळले. या कारवाई दरम्यान ६ जणांना अटक करण्यात आली असुन जुगाराच्या साहित्यासही जप्त करण्यात आले आहे.
उल्हासनगरमधील सी ब्लॉक मार्ग, डी टी कलानी कॉलेज परिसर येथे स्मोक हाऊस नावाचे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हुक्का पार्लरवर छापा टाकला. या वेळी मोहित खानचंदानी, राज वाल्मिकी, गणेश पवार, अमर सोनार, राज कानोजिया व दिलीप आहुजा हे ६ जण जुगार खेळताना पोलिसांना आढळले. त्यांच्या विरोधात कारवाई करत अटक करण्यात आली. जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरातील विविध चौकात, मुख्य जारपेठ परिसरात हुक्का पार्लर, ऑन लाईन झटपट लॉटरी, तीन पत्ते जुगार अड्डे असून पोलिसांनी यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. असे असुनही मात्र पोलिस बघ्याची केवळ भूमिका घेत असल्याचा आरोपही नागरिकांमधुन होताना दिसत आहे.