ठाणे -मुंबई आणि उपनगरांमध्ये असणाऱ्या अनेक रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. हे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज (28 एप्रिल) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा परिसरात आग लागल्याची घटना घडली. प्राइम क्रिटिकेयर नावाच्या या खासगी नॉन कोविड रूग्णालयात ही आग लागली. येथे एकूण 20 जण उपचार घेत होते. ज्यात 6 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तळमजल्यावरील मिटर बॉक्समध्ये आग लागल्यानंतर ही आग तेथील पुठ्ठ्याचे बॉक्स आणि इतर सामान जाळत पहिल्या मजल्यावरील आयसीयूपर्यंत पोहोचली. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत करताना 4 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
आगीवर नियंत्रण, पण...
यास्मिन सय्यद (वय 46), नवाब शेख (वय 47), हलिमा सलमानी (वय 70) आणि हरीश सोनावणे (वय 57) अशी मृतांची नावे आहेत. आगीचे वृत्त कळताच मुंब्रा पोलीस, 5 रुग्णवाहिका, टोरेंट ऑफिशिअल्स, आरडीएमसी आणि फायर ब्रिगेड तीन फायर इंजिन, 2 वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू व्हेइकल घटनास्थळी दाखल झाली. यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु इतरत्र हलविलेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत