ठाणे- मनीला येथून क्वॉलालाम्पूर मार्गे मुंबईत येण्यास निघालेल्या सुमारे ३०-३२ विद्यार्थ्यांना भारतात आणण्यास एअर इंडियाच्या विमानाने नकार दिला आहे. हे विद्यार्थी काल मलेशियात पोहोचले होते. त्यांना मलेशियन एअरलाईन्सने आज सकाळी सिंगापूरला नेले होते.
सिंगापूरला पोहोचताच विद्यार्थ्यांना लगेच एअर इंडियाच्या मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे तिकीट देण्यात आले. परंतु, आज दुपारी सिंगापूरहून एयर इंडियाच्या विमानाचे बोर्डिंग पास मिळतेवेळी मलेशियातून येणाऱ्या लोकांना भारतात प्रवेश न देण्याचे आदेश आल्याचे सांगण्यात आले. तसेच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच सिंगापूर एअर लाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना भारतात नेण्यास नकार दर्शविला. त्यामुळे, सध्या हे विद्यार्थी सिंगापूर येथे कोणत्याही मदतीशिवाय अडकले आहेत.