महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याणमधील २७ गावे मुलभूत सुविधापासून वंचित; गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय - thane

या गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. या निर्णयानंतर अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आपल्या बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम आहेत.

निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा गावकऱ्यांनी दिलेला इशारा

By

Published : Mar 29, 2019, 3:45 AM IST

ठाणे - कल्याण लोकसभा मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये असणारी घुसमट बाहेर येऊ लागली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावात मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांमध्ये विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. परिणामी या गावांमधील नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध असंतोष पसरला आहे. गेल्या ४ वर्षांपासून या २७ गावाची स्वतंत्र महानगरपालिका करण्याची मागणी सुरू आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र महानगरपालिकेचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यातही महापालिका प्रशासनाकडून या गावांना मुलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नसून गावात परिस्थिती भीषण बनली आहे. एकीकडे विकासकामे झाली नाहीत तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा गावकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे.

या गावातील ग्रामस्थांनी मिळून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. या निर्णयानंतर अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आपल्या बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम असून पुढील निर्णय गावातील तरुण घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details