ठाणे - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. मात्र, त्यानंतरही दिल्लीत तबलीग जमातीचा धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये सहभागी झालेले २५ प्रचारक कल्याणातून ताब्यात घेऊन त्यांची पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाच्या मदतीने सरकारी क्वारंटाईन केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हे २५ प्रचारक तबलीग जमातीचा कार्यक्रम झाल्यानंतर १२ मार्चला दिल्लीहून प्रवास करीत १३ मार्चला कल्याणात दाखल झाले होते. तेव्हापासून हे सर्वजण कल्याणातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीच्या दोन फ्लॅटमध्ये राहून कल्याण आणि भिवंडी परिसरात धर्माचा प्रचार करीत होते.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनही सतर्क होऊन जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून आहेत. त्यातच मूळचे दिल्लीचे रहिवाशी असलेले तबलीग जमातीचे २५ प्रचारक दिल्लीहून १३ मार्चला कल्याणात धर्म प्रचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून हे प्रचारक कल्याण आणि भिवंडी परिसरात प्रचार करीत होते. मात्र १ एप्रिल रोजी बाजारपेठ पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी केडीएमसीच्या आरोग्य पथकाच्या मदतीने ते वास्तव करीत असलेल्या इमारतीमधून त्यांना ताब्यात घेतले.