नवी मुंबई- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईमध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेचे 200 शिवसैनिक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक संध्या सावंत, उपविभाग प्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह जवळपास 200 शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 शिवसैनिक भाजपमध्ये - आमदार गणेश नाईक
शिवसेनेचे 200 शिवसैनिक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक संध्या सावंत, उपविभाग प्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह जवळपास 200 शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, नगरसेवक दशरथ भगत यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच भाजपचा झेंडा देऊन स्वागत केले. यावेळी पक्षप्रवेश केलेले कैलास सुकाळे व महिला कार्यकर्त्या संध्या सावंत यांनी आगामी निवडणुकीत भाजपचीच सत्ता नवी मुंबई महापालिकेवर आणण्यासाठी कार्य करू, असे आश्वासन दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षाला लागले आहे. त्यामुळे महानगरपालिकेवर आपली सत्ता आणण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.