ठाणे- प्रादेशिक मनोरुग्णालयात 2 मनोरुग्णांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना मागील आठवड्याभरात घडल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, तर या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील परिचर व परिचारिका अशा 6 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच दोघांना चौकशी पार पडेपर्यंत मनोरुग्णालयातून तूर्तास कार्यमुक्त केले आहे. चौकशी करून याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
हेही वाचा - कल्याणामध्ये मध्यरात्रीच चार गाड्यांची तोडफोड; परिसरात भीतीचे वातावरण
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुष कक्षातील संदीप पाटील यांनी 11 सप्टेंबरला, तर दीपक चौरासिया यांनी 17 सप्टेंबरला गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या परिसेविका कमल भोसले, अधिपरिचारिका वर्षा हिवाळे यांना कार्यमुक्त, तर परिचर सुरेश कुरकुटे, विनोद मरोठिया, तारासिंह चौहान आणि लेंबे यांना निलंबित केले आहे.
हेही वाचा - लोकलमधील महिलांची सुरक्षा करणाऱ्या 'महिला होमगार्ड'चीच सुरक्षा वाऱ्यावर
तसेच 15 ते 20 जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील कारवाईसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. आत्महत्या केलेले दोन्ही मनोरुग्ण फार वर्षांपासून उपचार घेत असून, त्यांना कुटुंबीय घरी घेऊन जात नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. यात कर्मचाऱ्यांचा काय दोष ? असा सवाल कर्मचारी संघटनेने केला आहे.