महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदीत रानडुकराची शिकार करणारे 2 शिकारी गजाआड; म्होरक्या फरार - राष्ट्रीय वनसंपतीचे रक्षण

शिकारीची हौस भागवण्यासाठी काही नागरिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींना घेऊन संचारबंदीतही रानडुकराची शिकार करण्यासाठी जंगलात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिकाऱ्यांच्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला असता वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात १०० किलोच्या रानडुकराची शिकार करताना २ शिकाऱ्यांना रंगेहात अटक केली. मात्र, शिकाऱ्यांचा मोरक्या फरार झाला असून वन विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहेत.

संचारबंदीत रानडुक्कराची शिकार करणारे  2 शिकारी गजाआड
संचारबंदीत रानडुक्कराची शिकार करणारे 2 शिकारी गजाआड

By

Published : Apr 22, 2020, 12:24 PM IST

ठाणे - शिकारीची हौस भागवण्यासाठी काही नागरिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींना घेऊन संचारबंदीतही रानडुकराची शिकार करण्यासाठी जंगलात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिकाऱ्यांच्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला असता वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात १०० किलोच्या रानडुकराची शिकार करताना २ शिकाऱ्यांना रंगेहात अटक केली. मात्र, शिकाऱ्यांचा मोरक्या फरार झाला असून वन विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहेत. ही घटना भिवंडी तालुक्यातील सागाव-देवचोळे येथील शासकीय जंगलात घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात वन्यजीव अधिनियमच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद गजानन भोईर (वय २८, रा. माशोडीपाडा, भिवंडी) बाळू जयराम गवारी (वय २५, रा. चिंचवली, भिवंडी) असे अटक केलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यातच लॉकडाऊनमुळे मटण - मासे यांचा तुटवडा असल्याने काही शिकाऱ्यांनी हौस भागवण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात स्थानिक लोकांना हाताशी धरून जंगलातील मोर, ससे, भेकर, लावरी, रानडुक्करसह इतर वन्यजीवांच्या शिकारीसाठी सापळे, फास लावताना दिसून येत असल्याची माहिती पडघा वन अधिकाऱ्यांनी दिली. तसेच अनेकदा शिकारीसाठी जंगलांना आगी लावल्या जातात आणि त्याची परिणती मोठ्या वणव्यात होऊन सर्व जंगले खाक होऊन जात असल्याचे सांगत एक छोटी शिकार करण्यासाठी शिकारी संपूर्ण जंगल पेटवून वनसंपदेचे अतोनात नुकसान करत आहेत.

यासाठी वनविभाग गावपातळीवर जाऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करून अशा प्रकारांना अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही विकृत मानसिकतेचे लोक जंगलाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अत्यंत कमी कर्मचारी उपस्थिती असताना वन गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे जिकरीचे असतानाही केवळ राष्ट्रीय वनसंपतीचे रक्षण जीवावर उदार होऊन वन कर्मचारी करताना दिसून येत आहेत. अटकेत असलेल्या २ आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची फॉरेस्ट कस्टडी सुनावण्यात आली असून उपवनसंरक्षक ठाणे डॉ. रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक बीटी कोळेकर व वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे अधिक तपास करत आहेत. तर, या कारवाईत पडघा वनपरिक्षेत्रातील वनपाल अशोक काटेसकर, आरएन गोरले, जेजी भोईर, वनरक्षक अजय राठोड, अमित कुलकर्णी, शरद म्हाडा या पथकाने सहभाग घेतला. मात्र, या कारवाईमुळे परिसरातील सराईत शिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून पडघा आरोग्य केंद्रातील आरोग्य पथकाने शिकार झालेल्या रानडुक्करांचे शवविच्छेदन करून जाळून नष्ट करण्यात आले.

दरम्यान, सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने विविध देशातील वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीच्या ठिकाणी सहज मुक्तसंचार करतानाची दृश्ये, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातच भारतातील जंगले विशेषत: महाराष्ट्रातील जंगले ही वैविध्यपूर्ण पक्षी, प्राणी, वृक्षसंपदेंने संपन्न असून वनविभाग व पक्षीमित्र, प्राणीमित्र यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आत्तापर्यंत या वनसंपदेत उल्लेखनीय वाढ झाल्याचे पडघा वनपरिक्षेत्रातील वनपाल अशोक काटेसकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details