नवी मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा पाच हजारच्या घरात पोहोचला आहे. रविवारी 154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 105 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये मागील 15 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. हा वाढणारा आकडा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकणारा आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 852 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत 16 हजार 953 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 11 हजार 385 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 726 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.
रविवारी नवे 154 रुग्ण आढळले. यात तुर्भेमधील 26, बेलापूरमधील 13, कोपरखैरणेमधील 40, नेरुळमधील 28, वाशीतील 17, घणसोलीमधील 18, ऐरोलीमधील 5, दिघ्यातील 7 रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमध्ये 46 स्त्रिया तर 108 पुरुष आहेत.