ठाणे : भिवंडी परिमंडळ मधील १२ गुन्ह्यासह ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यातील २ गुन्हे मिळून, एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले. १३ लाखाचा सोन्याचा ऐवज भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत केला आहे. भिवंडीतील गुन्हे शाखा घटक यांचे पथक गस्त घालीत असताना, साईबाबा मंदिरासमोर वेगात दुचाकीने भिवंडीकडे जाणारे दोन संशयित व्यक्ती आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते दोघे शहरातील शांतीनगर पिराणीपाडा येथे राहणारे असून त्यांची नांवे मोहझम नवाज शरीफ अन्सारी (२८) व नियाज अहमद हुसेन शेख (३२) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करून अधिक तपासासाठी २६ जून २३ पर्यंत पोलीस कोठडी घेतली.
१३ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत :या दरम्यान भिवंडी परिमंडळ-२ मधील शांतीनगर पोलीस ठाणे -४, निजामपूर पोलीस ठाणे-२, भोईवाडा पोलीस ठाणे-१, कोन पोलीस ठाणे-१, निजामपूर पोलीस ठाणे-१, शहर पोलीस ठाणे-३ आणि तालुका पोलीस ठाणे मधील-२ असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील २६० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यातील दुचाकी तसेच इतर ऐवज मिळून १३ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. दरम्यान त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली.