ठाणे - अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे ठाणे पोलीस सध्या कोरोनाच्या हिट लिस्टवर असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी २४ तास ऑनड्यूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिसांनाच आता कोरोनाची लागण सर्वाधिक होत असल्याची धक्कादायक आकडेवारी हाती आली आहे. ठाण्यात ४ अधिकाऱ्यांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून ७२ हून अधिक पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये मुंब्रा, वर्तकनगर, ठाणे नगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
ठाणे पालिका क्षेत्रामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारने लॉकडाऊन जाहीर केला असला तरी भाजी, जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली बाजारात गर्दी होत आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. मात्र, आता पोलीसच कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने चिंतेत भर पडली आहे. याची सुरुवात मुंब्य्रापासून झाली. येथील २ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह काही पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अख्खे पोलीस ठाणेच क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर वर्तकनगर आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.