ठाणे- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज अचानक १३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. १३ रुग्णांपैकी ६ रुग्ण डोंबिवली पूर्वेत तर ६ रुग्ण डोंबिवली पश्चिम परिसरात आढळून आले. एक रुग्ण कल्याण पूर्वेत आढळून आला. यामुळे कल्याण-डोंबिवली हद्दीत रुग्णांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. यामधील २ रुग्णांचा मृत्यू झाला, तर २६ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आज आढळून आलेल्या १३ रुग्णांमध्ये एका वर्षाच्या बालिकेचा समावेश असून ती डोंबिवली पश्चिम परिसरात राहणारी आहे. डोंबिवली पश्चिमेकडील ६८ वर्षीय महिलेचाही यात समावेश आहे. तसेच डोंबिवली पश्चिमेकडीलच रहिवाशी असलेले ४८ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय तरुण कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासात असल्याचे समोर आले आहे. डोंबिवली पश्चिमेकडीलच दुसऱ्या कुटुंबातील ४० वर्षीय महिला व ४२ वर्षीय व्यक्ती पण कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासात असल्याचे सांगण्यात आले असून आजच्या दिवसात डोंबिवली पश्चिम परिसरात अशी ६ रुग्ण आढळून आली आहेत.