ठाणे - भिवंडी शहरासह ग्रामीण भागात खासगीकरणातून वीज पुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्या मनमानी काभाराचा निषेध करत जवळपास 100 हून अधिक स्थानिक गाव-पाड्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीला याचा मोठा फटका बसणार आहे.
टोरेंट पॉवर कंपनीच्या कारभाराचा निषेध; 100 हून अधिक गावांचा मतदानावर बहिष्कार भिवंडी ग्रामीण मधील दिवे, केवणी, पाये, पायगाव, खारबाव, नवघर, अंजुर, मानकोली, सुरई, या गावांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यासोबतच भरोडी, ओवली, ठाकऱ्याचा पाडा, डोंगराली, अलीमघर, वडूनवघर, वडघर या गाव-पाड्यांतील गावकऱ्यांनी जनजागृती करत प्रत्येक गावात जाऊन मतदानवर बहिष्कार टाकण्यासाठी पुढाकार घेतला.
टोरेंट पॉवर कंपनीकडून वीज बिल तसेच अन्य खोट्या तक्रारी दाखल करून मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड लादण्यात येतो. याचा निषेध करण्यासाठी भिवंडी परिसरातील नागरिक एकवटले आहेत.
आजपर्यंत संबंधित कंपनीच्या विरोधात भिवंडीतील विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी मागील 4 ते 5 वर्षांत अनेकदा आंदोलने, मोर्चे तसेच उपोषणे केल्याचे गावकऱयांनी सांगितले. मात्र, या कंपनीच्या विरोधात कोणतीही कारवाई न करता सरकारने त्यांना अधिक मुदतवाढ दिली आहे. याच्या निषेधार्थ स्थानिकांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता एकत्र येत या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे दुसऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, मनसेकडून शुभांगी गोवारी आणि राष्ट्रवादीने माधुरी म्हात्रे यांना उमोदवारी जाहीर केली आहे. भिवंडी ग्रामीण मधील 100 हून अधिक गावांनी पुकारलेला असहकार या निवडणुकीवर मोठा परिणाम करणार आहे.