सोलापूर - शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने आज (गुरुवारी) सोलापुरात "युवा आक्रोश "आंदोलन करण्यात आले. युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आणि कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
भाजप सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटी या आत्मघातकी निर्णयामूळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. परिणामी उद्योगांवर मंदीचे सावट पसरले असून देशभरात कोटींच्यावर तर महाराष्ट्रात लाखांच्या घरात युवकांचे रोजगार गेले आहेत. सर्वत्र बेरोजगारी डोंगरासारखी वाढत चालली असतानासुद्धा सरकार मात्र तरुणांना रोजगार देण्याबाबत तसेच रोजगार गेल्यामुळे बेरोजगार झालेल्यांसाठी रोजगार निर्मितीबाबत कोणतेच पाऊल उचलताना दिसत नाही.
ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने गुरुवारी युवा आक्रोश आंदोलन करण्यात आले
आज दुष्काळ आणि नापिकीमुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. आता बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस कमालीची वाढू लागली आहे. त्यामुळे आत्महत्येसारखे लोण बेरोजगारांपर्यंत पोहोचू नये यासाठी सरकारने तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी भाजप सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी हे "युवा आक्रोश" आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
तर, महाराष्ट्रात भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली राजकारणाची पोळी पुन्हा भाजून घेण्यासाठी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा चुराडा करत असल्याचा आरोपही या आंदोलकांनी केला आहे.