सोलापूर - यावले - सालसे राज्य मार्गाच्या कामाला माढ्यात ब्रेक लागला आहे. टपरी धारकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. व्यावसायिकांचे पुनर्वसन केल्याशिवाय रस्त्याचे काम करु नये, अन्यथा सोमवारपासून (दि. १६) उपोषणास बसणार असल्याचे निवेदन मदन मुंगळे यांनी तहसीलदारांना दिले आहे. दरम्यान, माढ्याच्या वैभवात भर पाडणाऱ्या या मार्गाचे काम अजिबात थांबू देणार नसल्याची भूमिका भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे यांनी घेतली आहे.
व्यावसायिकांचे पुनर्वसन होण्यासाठी नगरपंचायतने देखील युद्ध पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. नगरपंचायतच्या मालकीच्या (स्वत:च्या) जागेत गाळे बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव येत्या दोन दिवसांत दिला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, राज्य मार्गाचे अभियंते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांच्यासह नगरसेवकांच्या बैठकीत बस स्थानका शेजारी असलेल्या बाजुने ९ मिटर तर दुसऱ्या बाजूने ९ मिटर असा १८ मिटर तर तांत्रिक ३ मिटर वाढवला जाणार होता. एकुण २१ मिटर रस्ता रुंद करण्याच्या विषयास ग्रीन सिग्नल या मिळाला होता. मात्र, मनकर्णा ओढ्याच्या शेजारी काम सुरु करताच तेथील नागरिकांनी विरोध दर्शवल्याने या मार्गाचे काम थांबविण्यात आले आहे.