पंढरपूर -विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ परिसरात सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिलाल अब्दुल कादर शेख ( वय २६ रा. लवंगी ता. मंगळवेढा) असे मृत वायरमनचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल यांच्याकडे मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, मुरलीधर चौक आदी भागातील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे दैनंदिन काम सुरू होते. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते विजेच्या खांबावर चढून काम करत होते. तेव्हा अचानक विद्युत पुरवठा सुरूळीत झाला. काही कळायच्या आत त्यांना विजेचा झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.