पंढरपूर- कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिवाळी पाडव्याला सुरू सुरू होणार आहे. मात्र विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाऐवजी भाविक वारकऱ्यांना केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. तसेच दररोज केवळ एक हजार भाविकांनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेता यणार आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग महत्त्वाचे असणार आहे. कोरोनाचे सर्व उपाययोजना करून हे दर्शन होणार, असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात करण्याचे आदेश दिले आहेत. दर्शनासाठी नियमावलीही तयार करून देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने विठ्ठल मंदिर समितीची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली, यावेळी समितीच्या सदस्यांचा विठ्ठल मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी उपस्थित होते.
पाडव्याला होणार विठूरायाचे मुखदर्शन; विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून या उपाययोजना असणार-कोरोना व्हायरसचा प्रतिबंधक उपाय म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझर टाकण्यात येणार आहे. तसेच मंदिर सुरू करण्यापूर्वी मंदिरात स्वच्छ्ता करण्यात येत आहे. भाविक सुरक्षित अंतरामध्ये थांबावेत यासाठी गोल आकाराचे चिन्ह रेखाटण्यात आले आहेत. त्याचबरोबर भाविक एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी भाविकांना सुरक्षित वेळेने दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक भाविकांमध्ये सहा फुटाचे अंतर असणार आहे. दर्शन रांगेतून मंदिर समितीकडून जागोजागी मार्किंग करण्यात आली आहे. त्याचबरोबर अधिक उपायोजना करण्यासाठी मंदिर समितीची बैठकीत घेण्यात आली.
ऑनलाईन दर्शनाची सोय-
विठ्ठल मंदिर समितीकडून विठ्ठलाचे मुख दर्शन घेण्यासाठी 24 तास ऑनलाइन बुकिंग सुरू असणार आहे. विठ्ठल मंदिर सकाळी सहा वाजता सुरू होऊन एका तासामध्ये 100 भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. असेच दिवसभरातून दहा तास मुखदर्शन होणार आहे. ऑनलाईन बुकिंग करताना 65 वर्षावरील व्यक्तीला बंदी असणार आहे, तसेच दहा वर्षाच्या आतील मुले, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांना मंदिरात प्रवेश बंदी असणार आहे. मंदिर प्रशासनाकडून वैद्यकीय सेवा सुरक्षा व्यवस्था सूचना फलक यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहेत.
कार्तीक एकादशीचे नियोजन अद्याप नाही-
26 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. एकादशीच्या चार दिवस आधीपासून भाविकांची पंढरपुरात गर्दी होत असते. गेल्या आठ महिन्यांपासून मंदिर भाविकांसाठी बंद होते. त्यामुळे यात्रेसाठी यंदा नेहमीपेक्षा जास्त संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. अद्याप शासनाने यात्रेच्या विषयी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे यात्रेच्या वेळी लाखोंच्या संख्येने भाविक आले तर त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याचे तसेच गर्दीवर नियंत्रण राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असेल.