सोलापूर- आजपर्यंत तुम्ही अनेक विवाह सोहळे पाहिले असतील. मात्र, आज पंढरपूर येथे विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पडत आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सनई-चौघड्यांच्या सुरात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास विविध फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.
सोन्याचं बाशिंग.. लगीन देवाचं ! पंढरीत आज विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा - Vitthal Rukmini wedding ceremony in Pandharpur
विठ्ठल मंदिरात वसंतपंचमीच्या मुहूर्तावर आज पांडुरंग आणि रुक्मिणी यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. देवाच्या या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शेकडो भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली आहे.
विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा
वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा पार पाडला जातो. या दिवशी देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.
आज सकाळपासून पंढरपुरात या आगळ्यावेगळ्या विवाहाची धामधूम सुरू झाली आहे. देवाच्या या विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी पंढरीत गर्दी केली आहे. या विवाहसोहळ्यासाठी विविध रंगांच्या रंगीबेरंगी फुलांनी मांडव अर्थात विठुरायाचे राऊळ सजवले जाते.