सोलापूर -भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरातील विविध ठिकाणी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी बुधवारी (30 जून) रोजी घोंगडी बैठका घेतल्या होत्या. या बैठका दिवसभर सोलापुरातील विविध ठिकाणी संपन्न झाल्या. भवानी पेठ येथील मडी वस्ती येथे सायंकाळी उशिरापर्यंत घोंगडी बैठक झाली. पण सोलापुरात सध्या 5 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठका घेतल्या आणि गर्दी जमा केली व कोरोना नियमावलीचे भंग केले. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आमदार गोपीचंद पडळकरांसह 25 जणांवर आपत्ती व्यवस्थापन आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. ते आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी विविध ओबीसी नेते व राजकीय नेते ओबीसी समाजाला सोबत घेऊन बैठका घेत आहेत. बुधवारी 30 जून रोजी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा सोलापूर दौरा झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विविध ठिकाणी घोंगडी बैठका घेण्यात आल्या होत्या. पण या बैठका घेण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती. कोरोना महामारीमुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाचे अनेक बंधन लावले आहेत. कोणत्याही सभेला किंवा राजकीय बैठकांना पोलीस परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. पण आमदार पडळकर यांच्या घोंगडी बैठकांची पोलीस परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापनाचे उल्लंघन