महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हवशे-गवशांचा महापूर..! सिध्दू'अण्णा विरुध्द सचिन'दादा' काँटे की टक्कर?

अक्कलकोट म्हटलं, की स्वामी समर्थांच्या पद स्पर्शाने पावन झालेली नगरी. मात्र, इथल्या राजकारण्यांची मात्र वेगळीच कथा. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे सद्या काँग्रेसचे सिध्दाराम म्हेत्रे हे आमदार आहेत. त्यांनी अक्कलकोटचा म्हणावा तसा विकास 'समर्थ'पणे केला नाही. तरीही, अनेक वेळा समर्थ नगरीची जनता त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली.

हवशे-गवशांचा महापूर..! सिध्दू'अण्णा विरुध्द सचिन'दादा' काँटे की टक्कर?

By

Published : Sep 23, 2019, 7:01 AM IST

सोलापूर- विधानसभेच्या जत्रेसाठी अनेकजणांना स्फुरण चढलं असून, या जत्रेत हवशे-नवशे, पावसाळ्यानंतर आलेल्या गवताप्रमाणे अकस्मातपणे उगवू लागले आहेत. ऊंच दरी कपाऱ्यातून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणं नवशांचा उत्साह पाहायला मिळत आहे. हौशांचा तर कोल्हापूर-सांगलीत आलेल्या पुरासारखं 'महापूर' आला आहे. अशीच अवस्था अक्कलकोट विधानसभा मतदार संघाची झाली आहे.

अक्कलकोट म्हटलं, की स्वामी समर्थांच्या पद स्पर्शाने पावन झालेली नगरी. मात्र, इथल्या राजकारण्यांची मात्र वेगळीच व्यथा. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे सद्या काँग्रेसचे सिध्दाराम म्हेत्रे हे आमदार आहेत. त्यांनी अक्कलकोटचा म्हणावा तसा विकास 'समर्थ'पणे केला नाही. तरीही, अनेक वेळा समर्थ नगरीची जनता त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली.

मात्र, त्यांनी आता काँग्रेसचा हात नाकारत कमळाकडे धाव घेतली. 'कमळ'वाल्यांची महाजनादेश यात्रा अजून सोलापूरला पोहोचली नव्हती. त्याच्या आदल्या रात्री सिध्दाराम म्हेत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला खास 'दुधनी'हून लातुरला गेले. त्यांनी पंताची भेट घेतली. सोलापूरच्या कार्यक्रमात कमळ प्रवेशाचा कार्यक्रम घेता येतो का? याचीही त्यांनी चाचपणी केली. पण फडणवीस यांनी म्हेत्रेंना 'गॅस'वर ठेवले.

मुख्यमंत्री फडणवीस यांना कळलं होतं की, म्हेत्रेंची पक्षात इंट्री झाली तर अक्कलकोट भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता आहे. कारण, सिध्दरामप्पा पाटील यांनी भाजपशी दुरावा साधल्यानंतर युवा सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यात पक्षाचे यशस्वी काम केले. सचिन कल्याणशेट्टी यांनी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मताच्या टक्केवारीत उल्लेखणीय वाढ करुन दाखवली. याच कामगिरीच्या जोरावर सचिन कल्याणशेट्टी भाजपकडून प्रमुख दावेदार समजले जात आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, सचिन कल्याणशेट्टी यांचे भाजपकडून नाव निश्चित झाल्याचे कळते. भाजपच्या व्यवस्थापनाने अक्कलकोट विधानसभेमध्ये एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये सचिन यांच्यावर जनता खूश असल्याचे दिसून आले. यामुळेच म्हेत्रेंना कमळवाल्यांनी जवळ केले नाही. सचिन कल्याणशेट्टींनी तर विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच प्रचार सुरू केला आहे. त्यांनी गावागावांमध्ये गुप्त बैठका २ महिन्यापूर्वीच सुरू केल्या आहेत, अशी सुत्रांची माहिती आहे.

दरम्यान, या मतदारसंघावर जरी सिद्धराम म्हेत्रे यांचे वर्चस्व असले तरी सचिन कल्याणशेट्टी यांच्या रुपाने 'तगडा' उमेदवार देण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र, या मतदारसंघात राज्याचे मंत्री विखे पाटील यांचे जावई गणेश माने-देशमुख यांनीही भाजपच्या तिकीटासाठी राजकीय ताकद पणाला लावली आहे. पण, लढत सचिन कल्याणशेट्टी विरुध्द विद्यमान आमदार सिध्दाराम म्हेत्रे अशीच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -पुण्यात जागावाटपावरून आघाडीत वादाची ठिणगी; पर्वती मतदार संघावर काँग्रेसचा दावा

हेही वाचा -2014 विधानसभा निवडणूक: "काठावर पास" आमदार

ABOUT THE AUTHOR

...view details