सोलापूर - मुस्लिम समाज सुद्धा आमच्या सोबत आहे. केवळ निवडणुकीत मत पाहिजे म्हणून मी बोलत नाही, तर धर्म म्हणून आम्ही हिंदुत्ववादी आहोतच. तरीसुद्धा मुस्लिम समाज सोबत येतोय. ती सुद्धा माणसेच आहेत. जो या देशावरती प्रेम करतो तो मुसलमान असला तरी तो आमचा भाऊ आहे. ही आमची उघड उघड भूमिका व आमचे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, असे वक्तव्य शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोला येथील प्रचार सभेमध्ये केले आहे. ते सांगोला विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी सांगोला येथे आले होते.
ते पुढे म्हणाले की, मी वचननामा दिला आहे. हा शिवसेनेचा वचननामा पूर्ण करण्यासाठी शहाजीबापू पाटील यांना निवडून द्या. राज्यामध्ये आपले भगवे सरकार आले पाहिजे. शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी शहाजी बापू यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले. मी भाजप सोबत युती केली आहे. काही लोक म्हणाले उद्धव ठाकरेने यू टर्न मारला. पण मी यू-टर्न मारल्यानंतर तो जनतेने स्वीकारला. त्यामुळे जनतेने माझे खासदार निवडून दिले. सांगोला तालुक्यामध्ये दीपक आबांनी सुद्धा यावेळी शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे. अशी लढवय्या माणसे आपल्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित होणार आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.