सोलापूर- करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र दुर्घटना प्रकरणी चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच 22 जण यात जखमी झाले होते.
पोलिसांनी या प्रकरणी इमारतीचे मालक शोभा जीवनधर दोशी, राजेश जीवनधर दोशी, संदेश जीवन दोशी, सुचिता जितेंद्र दोशी (रा. सर्व करमाळा) यांच्याविरोधात कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी राजेश व संदेश या दोघांना अटक केली आहे.
करमाळा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे छत कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणी करमाळा पोलिसात गून्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा पोलिसांनी इमारतीच्या चार मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
करमाळा शहरातील महेन्द्रनगर भागातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता छत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता तर, 22 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी बँकेचे कर्मचारी योगेश्वर पंजाबराव ठाकरे यांनी फिर्याद दिली आहे. ज्या इमारतीमध्ये बँक होती त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आतील बांधकाम करण्यासाठीची कोणतीही परवानगी मालकांनी घेतलेली नव्हती.