माढा(सोलापुर) - कोरोनामुळे अनेकांची ठरलेली लग्न थांबली आहेत. तर, काही जण मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत लग्न उरकत आहेत. असे असतानाच माढा तालुक्यातील उपळाई(बुद्रुक) गावात दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतातील झाडाखाली साध्या पद्धतीने लग्न करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
कोरोनाची ड्युटी आणि विवाह याचे गणित जुळवणे दोन्ही कुटुंबियांना कठिण वाटत होते. अशातच दोघांनीही कुटुंबियांशी चर्चा करीत विवाह साध्या पद्धतीने केला. केवळ आठ लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले. सोशल डिस्टंसिंगचे पालन व मास्क वापरुन दोघे अधिकारी विवाह बंधनात अडकले आहेत. माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूकच्या भाग्यश्री रघुनाथ बेडगे यांचा विवाह चिंचोली येथील विशाल भागवत लोंढे यांच्याशी ठरलेला होता. परंतु कोरोनाने हाहाकार घातला अन् त्यात सोलापुर जिल्ह्यात या विषाणुचा कहर वाढत चालला आहे.
माढ्यात दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतात झाडाखाली केले लग्न - madha lockdown wedding
माढा तालुक्यातील उपळाई(बुद्रुक) गावात दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतातील झाडाखाली साध्या पद्धतीने लग्न करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
दोन्ही ही कुटूंबियांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत साध्या पद्धतीने लग्न करण्याच्या मुला-मुलीच्या निर्णयाला होकार दिला. त्यानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उपळाई बुद्रुक येथे शेतातील झाडाखाली हे लग्न पार पडले. वनधिकारी असलेले विशाल लोंढे व कर निर्धारण अधिकारी असलेल्या भाग्यश्री बेडगे यांनी साधेपणाने शेतातील झाडाखाली लग्नाचा विधी पूर्ण करत लग्न समारंभ पार पाडला.
वधु वराच्या आप्त स्वकियांनी व्हिडोयो काॅलदारे दोन्ही अधिकाऱ्यांना वैवाहीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे सगळीकडे कौतुक होत आहे.