सोलापूर -माझ्याकडे मोबाईल नाही, मला नातेवाईकांना फोन करायचे आहे, अशी थाप मारून मोबाईल मागून घेणारे व गर्दीचा फायदा घेत नजर चुकवून हातोहात मोबाईल लंपास होत असल्याची तक्रार शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेने दोन संशयित मोबाईल चोरट्यांना अटक करुन 2 लाख 65 हजार रुपयांचे मोबाईल व 50 हजार रुपयांची दुचाकी, असा 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विशाल जगन्नाथ पोसा (वय 29 वर्षे, रा. लिमयेवाडी, सोलापूर), डॅनियल डेव्हिड त्रिभुवन (वय 24 वर्षे, मूळ रा. मोदीखाना, सोलापूर) या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे हे 3 ऑगस्टला रोजी आपल्या पथकासह सोलापूर शहराच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. अभिलेखवरील चोरटे व सारसईत गुन्हेगार यांचा शोध घेत होते. त्यावेळी डॅनियल त्रिभुवन व विशाल पोसा हे दोघे चोरीचे मोबाईल विक्रीसाठी मोदीखाना परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी आपल्या पथकासह सापळा लावला होता.
मोबाईल विकत असताना विशाल व डॅनियल या दोघांना पथकाने रंगेहाथ मोदीखाना येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अधिक तपासणी करुन सुरुवातीला काही मोबाईल जप्त केले. तपासाचे अधिक कौशल्य वापरून त्यांची कसून विचारपूस करण्यात आली. त्यावेळी त्यांनी कबुली दिली. शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दीमध्ये नागरिकांचे मोबाईल फोन करतो म्हणून घेतले आणि हातोहात लंपास केले असल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांकडून सॅमसंग, विवो, रेड मी, रिअल मी अशा विविध कंपन्यांचे 2 लाख 65 हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत केले.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस नाईक दिलीप नागटिळक, विजय वाळके, संदीप जावळे, संतोष येळे, अयाझ बागलकोटे, पोलीस शिपाई गणेश , सोमनाथ सुरवसे, सागर गुंड आदींनी केली.