सोलापूर - गेल्या अनेक वर्षांपासून पाणी रस्ता यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या माढा तालुक्यातील ३ गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला आहे. उजनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आलेगाव खुर्द, रुई, गारअकोले या गावांचा यात समावेश आहे. या गावांतील नागरिकांनी आलेगाव येथे बैठक घेऊन मतदानावरील बहिष्काराचा निर्णय घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून पाणी आणि रस्ता यासारख्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे. वर्षानूवर्षे निवेदन, अर्ज विनंत्या करून हे गावकरी वैतागले आहेत. मात्र, अजूनही त्यांचे मूलभूत प्रश्नी मार्गी लागलेले नाहीत. हे प्रश्न न सुटल्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे.
ही गावे भीमा नदी लगत असूनही पाण्याअभावी पिके जळून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या भागाची मुख्य समस्या म्हणजे नदीपात्रात पाणी टिकून राहत नाही. सोलापूर जिल्ह्यातील रुई, आलेगाव खुर्द, गारअकोले तसेच पुणे जिल्ह्यातील भांडगाव बावडा गणेशवाडी या गावालगतच्या भीमा नदीचे प्रवाह पात्र अत्यंत उथळ स्वरूपाचे आहे. त्यामुळे या ठिकाणची नदीपात्रातील पाणी साठवणक्षमता शून्य आहे. त्यासाठी भीमा नदी वरती आलेगाव खुर्द येथे बंधारा किंवा भिंत बांधणे गरजेचे आहे, त्यामुळे या भागाचा कायमस्वरूपीचा प्रश्न सुटणार आहे. प्रशासन मात्र प्रत्येक वर्षी सक्तवसुली पद्धतीने पाणीपट्टी शेतकऱ्यांकडून घेत असते. प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने उपोषणे करूनही हा प्रश्न सुटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.