सोलापूर- आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना लाडूचा प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. वारीसाठी आलेले लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचा प्रसाद म्हणून लाडू घेऊन जातात. या आषाढी यात्रेत येणाऱ्या गर्दींचा अंदाज लक्षात घेता १२ लाख बुंदीचे स्वादिष्ट लाडूचा प्रसाद तयार करण्यात येणार असल्याचे सुवर्णक्रांती महिला गृह उद्योग सहकारी संस्थेच्या कविता गवळी यांनी सांगितले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून सुवर्णक्रांती महिला गृहउद्योग सहकारी संस्थेला लाडू बनविण्याचे काम देण्यात आले आहे. १२ जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. ते भाविक मोठ्या श्रध्देने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू आपल्या गावी घेऊन जातात. यामुळे मंदिर समितीने मागील वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी २ लाख लाडू जादा बनवण्याचे काम सुरु केले आहे.
यासाठी एम.टी.डी.सी. येथे स्वच्छ ठिकाणी १२ लाख लाडू बनविण्याचे काम सुरु आहे. एकाच वेळी सर्व लाडू न बनवता, मागणी नुसारच लाडू बनवण्यात येणार आहे. लाडू बनवण्याचे काम ४ आचारी, ७० महिला व २० पुरुष कर्मचाऱ्यांमार्फत सुरु आहे. लाडू बनवणत असताना अन्न व औषध विभागाकडून दिलेल्या सर्व सुचनांचे पालन सुरु आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन घेणे. डोक्यावर टोपी घालणे. अंतर्गत स्वच्छता ठेवणे. आदी सुचनांचा सहभाग आहे. त्याचबरोबर लाडू बनविण्याच्या केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराने सीसीटीव्ही बसविले आहेत.
प्रसादाचा एक लाडू ७० ग्रॅमचा बनविला जातो. पिशवीमध्ये दोन लाडू दिले जातात. ही लाडूची पिशवी मंदिर समितीला साडेबारा रुपयांना दिले जाते. मंदिर समिती ही दोन लाडूची पिशवी भाविकांना १५ रुपयांना विक्री करते. लाडू प्रसादाच्या विक्रीतून देखील मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.