सोलापूर- एका मातेने वर्षानंतर आपल्या पोटच्या गोळ्याला पाहिले आणि तिचे हृदय हेलावले. तीन वर्षांच्या लहानग्याला पाहताच तिने हंबरडा फोडला आणि धावत जाऊन त्याला मिठीत घेतले, मुके घेतले. सोलापुरातील बेघर निवारा केंद्रात सोमवारी (5 ऑक्टोबर) दुपारी या भावनिक घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्यांचे डोळे पाणावले.
सोलापूर रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या पोस्ट ऑफीस परिसरात कविता सुरेश काळे ही टाळेबंदीपूर्वी आढळली होती. ती मनोरुग्णप्रमाणे वागत असल्याचे निदर्शनास आले. तिला सोलापूर महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. सलग सात महिने येथील वैशाली आव्हाड, प्रदीप नागटिळक यांनी कविताचे समुपदेशन करत तिच्यावर उपचार केले. बेघर निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कविताच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला उपजीवेकेसाठी काही वस्तू दिल्या. त्या वस्तू विकून ती काही पैसे जमवत होती. तिच्याशी गप्पा मारताना तिची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तिचे माहेर मुंबईजवळील अंबरनाथ असून पुणे येथील सुरेश काळेसोबत तिचे लग्न झाले आहे. तिला एक मुलगा देखील असल्याची माहिती समोर आली.
गूगल सर्च करून कविता काळेच्या पतीचे कामाचे ठिकाण व तेथील संपर्क क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सोलापुरात बोलावण्यात आले. पती, भाऊ व काका सोमवारी सोलापुरात दाखल झाले. पण, कविताला आपला तीन वर्षाचा मुलगा सिद्धेशला पहायचे होते. आपल्या पोटच्या गोळ्याला पाहताच कविताने त्याला जवळ घेतले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दृश्य पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले.