पंढरपूर - अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे, नीरा व भीमा नदी काठी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह 4 हजार कुटुंबातील 16 हजार नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पूरस्थित मदत व बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
पूर परिस्थितीमुळे 16 हजार नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले - अतिवृष्टी पंढरपूर
पूर परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह 4 हजार कुटुंबातील 16 हजार नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
शहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर, लखुबाई मंदीर परिसर नागरिकांना केंद्रे महाराज मठ, सारडा भवन, तनपुरे महाराज मठ, लोकमान्य शाळा, चैतन्य महाराज मठ, गंगागिरी मठ तसेच पर्यटक निवास येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांना विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समाज मंदिरे, मंदिरे आदी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत आवश्यक आरोग्य पथकासह औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पूरस्थितीत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नदी पात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या तीव्रतेने सुरु आहे. नदी पात्राच्या काठावरील कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाच्या व बचाव पथकाच्या मदतीने सुरु आहे. तालुक्यातील सरकोली येथील तीन नागरिकांना आज वजीर रेसक्यु फोर्सच्या मदतीने नदीच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढले आहे. तसेच कौठाळी येथून व्हाईट आर्मीच्या मदतीने नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याचे तहसिलदार वैशाली वाघमारे व गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.