सोलापूर/पंढरपूर - तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मंगळवारी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. केसीआर यांच्यासमवेत तेलंगाणाचे अख्खे मंत्रिमंडळ सोमवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. केसीआर यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
भगीरथ भालकेंचा बीआरएसमध्ये प्रवेश - विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर भालके यांनी मंगळवारी (27 जून) तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भालके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. भगीरथ भालके यांच्यासह पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते बीआरएसमध्ये दाखल झाला आहेत.
स्वाभिमान जपण्यासाठी राष्ट्रवादी सोडली : भगीरथ भालके यांनी मंगळवेढा येथे 24 जून रोजी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करत बीआरएस प्रवेशाबाबत चर्चा केली होती. स्वाभिमान जपण्यासाठी राष्ट्रवादी सोडत असल्याचे भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. तसेच यावेळी भालके यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोपही केले होते.