सोलापूर : Telangana Assembly Elections : केसीआर यांच्या कन्या आमदार के. कविता यांनी नवरात्रोत्सवात ब्रतुकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. रविवारी दुपारी के. कविता ब्रतुकम्मा उत्सवात सहभागी झाल्या होत्या. तेलंगाणाच्या आमदार के. कविता या माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार निशाणा साधलाय. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या 105 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. तेलंगाणा राज्यात बीआरएस पक्ष चांगली लढत देईल. भाजपानं यादी जाहीर केली तरी, बीआरएस पक्षाला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार के. कविता यांनी दिली आहे.
केसीआर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन इतिहास रचतील : तेलंगाणा राज्यात के. चंद्रशेखर राव गेल्या दोनवेळेपासून मुख्यमंत्री आहेत. बीआरएस पक्ष दक्षिण भारतात इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. यावेळी देखील के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री होतील, असा विश्वास कविता यांनी व्यक्त केला. केसीआर दक्षिण भारतात नवा इतिहास घडवतील, अशी अशा देखील त्यांनी व्यक्त केलीय. भाजपा असो किंवा काँग्रेस, बीआरएस पक्षाला जनतेचा पाठिंबा आहे. टीव्हीवर आलेल्या ओपिनियनवर आमचा विश्वास नाही. आम्ही जनतेच्या ओपिनियन पोलवर विश्वास ठेवतो, असं कविता यांनी म्हटलं आहे.