सोलापूर Teacher Drown in Well :नवीन घेतलेली चारचाकी दाखवण्यासाठी मेहुण्याच्या घरी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाचा कारसह विहीरीत बुडून मृत्यू झाला आहे. कार चालवायला जमत नव्हती. तरीदेखील त्यांनी छोटासा ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातच अपघात झाल्यानं शिक्षकाचा मृत्यू झाला. इरण्णा बसप्पा जुजगार (वय ४१ रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) असे मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
पाच दिवसांपूर्वी नवीन कार घेतली होती-इरण्णा जुजगार यांनी पाच दिवसांपूर्वी एमएच १३ - इसी - ६०६८ या क्रमाकांची चारचाकी घेतली होती. रविवारी सुटी असल्याने ते आपल्या कुटुंबीयांसमवेत ते भाटेवाडी डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे सासरी गेले होते. ड्रायव्हरसह सर्वजण खाली उतरले होते. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी उन्हात उभी असलेली मोटार सावलीत लावण्याचा प्रयत्न केला. चारचाकीच्या स्टेअरिंगवरील त्यांचा ताबा सुटला. अचानक कारवरील नियंत्रण सुटलं. ब्रेक दाबण्याऐवजी एक्सिलेटरवर पाय पडला. कार स्टार्ट करताच स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि नवीन कार थेट विहिरीत कोसळली. या अपघातात ४१ वर्षीय शिक्षकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना भाटेवाडी डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील अमले वस्तीवर रविवारी दुपारच्या सुमारास घडली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांचे मेहुणे चंद्रशेखर अमले यांनी इरण्णा जुजगार यांना विहिरीतून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.