सोलापूर- श्रीक्षेत्र अक्कलकोटचे श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांसाठी मदत पाठविण्यात आली आहे. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली, मंडळाकडून एक लाख पाकिटे खाद्यपदार्थ व इतर साहित्य पाठविण्यात आले आहे.
माहिती देताना न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने यापूर्वी देखील दुष्काळ, भूकंप, व अतिवृष्टीच्या काळात राज्यासह परराज्यातही मदत केली आहे. त्याचप्रमाणे याही वेळेस पूरग्रस्त जिल्ह्यांना मंडळाकडून खाद्यपदार्थमध्ये 361 बॉक्स बिस्कीट पुडे, 10 हजार पोती चिवडा, 33 बॉक्स स्नॅक्स पुडे, 33 बॉक्स उपवासाचा फराळी चिवडा आणि पिण्याच्या पाण्याच्या ११ हजार बाटल्या देण्यात आल्या. हे सर्व सामान 5 ट्रकांमध्ये भरुन रविवारी सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले.
यामध्ये हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेकडून पूरबाधितांसाठी सॅनेटरी नॅपकीन, व्हिक्स डब्या, ग्रामपंचायत सांगावी (बु) व ग्रामस्थांकडून बिस्कीटांची पाकिटे, पाणी बॉटल, फरसानसह इतर आवश्यक साहित्य पाठविण्यात आले. अक्कलकोट नजीक असलेल्या समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीतील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाकडून चार पोते तांदूळ पाठवण्यात आले. तसेच न्यासाच्या सुरक्षा विभागातील राजू पवार यांच्याकडून पाणी बॉटल, बालाजी कपडा भंडार रणसुभे यांच्याकडून मुलांचे-मुलींचे यासह पुरुष-महिलांचे २ हजार ५०० कपड्यांसह बिस्कीटांचे बॉक्स देण्यात आले.
यावेळी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले उपस्थित होते. त्यांच्या उपस्थित धुळे येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व औरंगाबादचे वरिष्ठ न्यायाधीश आशिष आयचित यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाहनांना सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले.