सोलापूर -शुक्रवारी समान निधी वाटप, अतिक्रमण आदी विषयांवर चर्चा होताना नगरसेवकांचा गोंधळ पहायला मिळाला. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांना महापौर श्रीकांचना यन्नम यांनी एका दिवसासाठी सभागृहातून निलंबित केले. अभूतपूर्व गोंधळात आजची सभा झाली. वाढत्या गोंधळामुळे महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. महापौरांसोबत असभ्य वर्तन करणारे नगरसेवक सुरेश पाटील यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.
सोलापूर पालिकेत गोधळ करणाऱ्या नगरसेवकांच निलंबन शहरातील अतिक्रमणमुळे गोंधळ झाला सुरू -
दोन दिवसांपूर्वी शहरात असलेल्या घोंगडे वस्ती येथे महानगरपालिका प्रशासनाने नाल्यावरील अतिक्रमण काढले. नाल्यावर 10 ते 15 कुटुंबांचे घर होते. मात्र, अचानक झालेल्या अतिक्रमण कारवाईमुळे त्यांचे संसारोयोगी साहित्य रस्त्यावर काढून ठेवण्यात आले होते. महानगरपालिका प्रशासनाच्या जेसीबी मशीनने नाल्यावरील पत्र्याचे शेड जमीन दोस्त केले. हा मुद्दा घेत एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळास सुरुवात केली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील या गोंधळात उडी घेत महापौरांच्या दालनासमोर जाऊन आरडाओरड केली, आणि पुनवर्सन करा अशा घोषणा दिल्या.
समान निधी वाटपावरून सुरेश पाटील यांचा हंगामा-
माजी सभागृह नेता व विद्यमान नगरसेवक सुरेश पाटील यांनी समान निधी वाटपावरून महापौरांवर हल्लाबोल केला. महापौर श्रीकांचना यन्नम या जातीवादी आहेत, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. यावेळी इतर भाजपा नगरसेवकांनी भाजपा नगरसेवक सुरेश पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरेश पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सुरेश पाटील यांना एका दिवसासाठी सभागृहातून निलंबित केले.