सोलापूर- राजकीय जीवनात सोलापूरच्या मार्केटिंगचा कांगावा करणाऱ्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा खरा व्यावसायिक चेहरा पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या समोर आला आहे. कारण सोलापूरकरांच्या इतिहासाची साक्ष असणाऱ्या नरसिंग गिरजी मिलची जागा विकण्याचे सूतोवाच खुद्द सहकार मंत्र्यांनी केले आहे.
राज्यात मुंबई, नागपूरनंतर कापड गिरण्यांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख होती. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यनंतरही सोलापूरच्या या कापड गिरण्या लोकांच्या जगण्याची केंद्र होत्या. गिरणीकामगार संस्कृती याच शहरांमध्ये रुजली. मात्र ८० च्या दशकात जे हाल इतर शहरांतील कापड गिरण्यांचे आणि तेथील कामगारांचे झाले, तेच सोलापुरातील या उद्योगाचेही झाले. हा संपूर्ण उद्योगव्यवसाय बंद पडला.
सहकारमंत्री देशमुख - एनजी मिल विक्री प्रक्रियेबद्दल बोलताना नरसिंग गिरजी मिल ही या बंद पडलेल्या गिरण्यांपैकीच एक आहे. १८९८ ते २००२ असा तिचा एकूण प्रवास आहे. आधुनिक सोलापूर शहराचे शिल्पकार अप्पासाहेब वारद यांच्या पुढाकारातून ही मिल सुरू झाली. सोलापुरातील स्थानिक व्यक्तीने पुढाकार घेऊन स्थापन केलेली ही पहिली मिल होती. आजही तीन पिढ्यांपासून या मिलशी संबंध असलेली हजारो कुटुंबे सोलापुरात आहेत. वारदांचे भागीदार म्हणून हैदराबादचे गिरजी घराणे सामील झाले. म्हणून तिचं नांव नरसिंग गिरजी ठेवण्यात आले.
एन. जी. मिलच्या अतिथिगृहात लोकमान्य टिळकांपासून बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांपर्यंत अनेक लोकोत्तर व्यक्ती राहून गेल्याचे उल्लेख आहेत. मात्र २००२ नंतर महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात या गिरणीचा परिसर गेला आहे. दोन वर्षांपूर्वी एन. जी. मिलमध्ये गारमेंट पार्क उभारण्याची घोषणा याच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. ती माग पडून आता म्हाडामार्फत या मिलची जागा विकण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. या मिलच्या वास्तूचा समावेश सोलापूर शहराच्या हेरिटेज वास्तूंच्या ग्रेड एक प्रकारात आहे. १८९८ साली बांधली गेलेली मिलची मुख्य इमारत कलोनियल इंडो बरोक शैलीचा उत्तम नमुना समजली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात, किंबहुना संपूर्ण देशात इतके उत्तम दगडी कोरीव काम केलेली मिलची इमारत ही एकमेव आहे. तिचे आंतरराष्ट्रीय मानकानुसार जतन संवर्धन केल्यास देशी-विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरेल इतकी तिची योग्यता वास्तुकला, ऐतिहासिक व तांत्रिक निकषावर आधारलेली आहे.
पर्यटनासाठी विकास होऊ शकतो
मिल परिसरातील वास्तूंचे जतन संवर्धन करून पुन्हा उपयोगात आणून नवे जीवन देणे, पर्यावरण, इतिहास आणि संस्कृती या सर्व दृष्टीने या ठिकाणी प्रदर्शन, संमेलन, कला, वस्त्रोद्योग वस्तुसंग्रहालय किंवा उद्यान म्हणून विकसित करता येऊ शकते. तसे झाल्यास शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ही पर्यटन वास्तू ठरणार आहे. म्हणून नागरिकांच्या सहभागातून ऐतिहासिक वारसा जतन-संवर्धन करणाऱ्या ‘इंटॅक’ या संस्थेने सरकारचे आर्थिक नुकसान न होता, या मिलचा विकास करणे कसे शक्य आहे, याचा अहवालही राज्य सरकारला दिला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी या मिलच्या जागेच्या व्यावसायिक वापराचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे सोलापूरकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. असे असतानाच आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.