सोलापूर - पुरात वाहून गेलेल्या दुभत्या जनावरांसाठी प्रत्येकी 30 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. पूरग्रस्त भागातील वाहून गेलेल्या पशुधनाच्या मालकाला आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक व संबंधित पशुधनाचे मालक यांनी स्वाक्षरी केलेला स्पॉट पंचनामा, मदतीसाठी ग्राह्य घरण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
नुकसान झालेल्या जनावरांच्या गोठ्यांसाठीही मदत करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार 2100 रुपये प्रती गोठा मदत देण्यात येईल. शेतीसाठी एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ, बाधीत कुटुंबांना ३ महीने गहू आणि तांदूळ मोफत वाटप करण्यात येत आहे. पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून केले जात आहे. तसेच राज्य शासनाकडून अतिरीक्त एक लाख रुपये दिले जातील. घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात 24 आणि शहरी भागात 36 हजार रुपये देण्यात येतील. कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली ३ महिने स्थगित करण्यात आली आहेत.