सोलापूर -रत्नागिरीच्या तिवरे धरण फुटीनंतर शिवसेना नेते व पुनर्वसन मंत्री तानाजी सावंत यांच्या 'खेकड्यांमुळे धरण फुटले' या वक्तव्यामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली होती. त्यानंतर शिवसेनेला समाज माध्यमांवर ट्रोलही करण्यात आले. हा विषय आता संपलाय असे वाटत असतानाच एका विद्यार्थ्यांने 'आदित्य संवाद'मध्ये थेट आदित्य यांच्याकडून पुन्हा एकदा या विषयावर उत्तराची अपेक्षा केली. विशेष म्हणजे यावेळी खुद्द तानाजी सावंत कार्यक्रमात उपस्थित होते.
तिवरेधरण खेकड्यांनी फोडलं का? आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर - आदित्य ठाकरे
एका विद्यार्थ्याने 'आदित्य संवाद'मध्ये थेट आदित्य यांच्याकडून पुन्हा एकदा तिवरे धरणाच्या विषयावर उत्तराची अपेक्षा केली. विशेष म्हणजे यावेळी खुद्द तानाजी सावंत कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी विषयांतर करून आदित्य यांनी वेळ मारून नेली.
विद्यार्थ्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी आधी 'तुम्ही हा प्रश्न इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना विचारयला हवा' असा सल्ला दिला. पुढे ते म्हणाले, धरण अनेकदा घर्षणामुळे फुटते, दगडावर पाण्याची लाट आदळल्याने फुटते तसेच एखाद्या ठिकाणी जास्त हालचाल झाल्यानेही ते फुटू शकते. खेकड्यांनी जास्त हालचाल केल्यामुळे धरण फुटले असावे असे गावकऱ्यांना वाटले होते, असा खुलासा करत आदित्य यांनी सारवासारव केली.
आदित्य म्हणाले, 'धरण कुणामुळे फुटले याचा विचार करण्यापेक्षा आत्ता राज्यात जी धरणे आहेत त्यांचे मजबुतीकरण करणे आणि ते सुरक्षित आहेत का ते तपासणे गरजेचे आहे' अशाप्रकारे विषयांतर करून आदित्य यांनी वेळ मारून नेली.
दरम्यान, एका विद्यार्थ्याने हा प्रश्न उपस्थित करुन आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला खेकड्याचा डंक मारला अशी चर्चा उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये सुरू झाली होती.