सोलापूर -टेंभुर्णी येथील बेकरी व्यापारी संजय मारुती काळे यांचा दोन दिवसापूर्वी खून झाला होता. खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची नोंद टेम्भुर्णी पोलीस ठाण्यात झाली होती. शेवटी या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, पोटच्या मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, वडिलांचे बाहेर एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून वडील घरातील सदस्यांना त्रास देत होते. त्यामुळे मित्रांच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची माहिती मुलगा आकाश संजय काळे याने पोलिसांना दिली.
पोलिसांनी या प्रकरणी आकाश संजय काळे याच्यासह लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे (२७) आणि अलाऊद्दीन ऊर्फ आलम बासु मुलाणी (३३) दोघे राहणार सुर्ली, तालुका माढा असे एकूण तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना 6 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.